बेळगावातील काँग्रेसच्या रॅलीमध्ये डी. के. शिवकुमार, धिरज देशमुख सहभागी
काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ बेळगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निघालेल्या रॅलीमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख सहभागी झाले होते. मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (ता. १५) दाखल केला. त्यानंतर अलोट जनसमुदायाच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीशण्णा जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार धिरज देशमुख, आमदार प्रकाशन्ना हुक्केरी, आमदार लक्ष्मण अण्णा सवदी, आमदार अशोक अण्णा पट्टणा, आमदार राजू अण्णा कागे, आमदार महंतगंगा काळे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विश्वास वैद्य, आमदार राजू सेठ, आमदार चन्नराजा हत्तीहोळी, अशोक पुजारी, महांतेश काडाडी लक्ष्मणराव चंडे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, या रॅलीमध्ये सहभागी झालेला प्रचंड जनसमुदाय काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचा पुरावा आहे. बेळगाव आणि सर्वच ठिकाणी काँग्रेस पक्षाला आपण सर्वांनी बळ द्यावे. आमदार धिरज देशमुख म्हणाले, देशातील वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याला जनता कंटाळली आहे. त्यामुळे देशात काँग्रेस पक्ष सत्तेत येणे गरजेचे आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना आपण भरभरून आशीर्वाद देवून विजयी करावे.