लातूर शहरातील रामनवमी उत्सवात खा. सुधाकर श्रृंगारे यांचा सहभाग
लातूर : रामनवमीनिमित्त प्रभु श्रीरामाचे दर्शन घेत लातूर शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी रामभक्त व नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छाही दिल्या.
रामनवमी निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मिरवणुका, महाप्रसाद वाटप यासह धार्मिक कार्यक्रम शहरात संपन्न झाले. खा. सुधाकर श्रृंगारे यांनी या सर्वच ठिकाणी भेटी दिल्या. शहरातील राम गल्ली भागात असणार्या प्राचिन श्रीराम मंदिरात खा. श्रृंगारे प्रभु श्रीरामांचे दर्शन घेत नतमस्तक झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या गावाभागातील नागरिकांशी त्यांनी संवादही साधला. त्यानंतर त्यांनी शहरातील कन्हेरी रोड परिसरात सुपारी हनुमान मंदीर येथे आयोजित श्रीरामजन्मोत्सव कार्यक्रमास भेट दिली. पटेलनगर परिसरात संपन्न झालेल्या उत्सवातही खा. सुधाकर श्रृंगारे सहभागी झाले. दयानंद गेट परिसरात युवकांच्या पुढाकारातून रामनवमीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणीही भेट देत खा. श्रृंगारे यांनी युवक व कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावत त्यांचा उत्साह द्विगुणीत करत उपस्थितांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांशी संवाद साधताना खा. श्रृंगारे म्हणाले की, यावर्षीच्या रामनवमीचा उत्साह जागतिक पातळीवर दिसून येत आहे. दि. 22 जानेवारी रोजी अयोध्येत बालक रामाची स्थापना झाली. शेकडो वर्षानंतर रामचंद्र आपल्या जन्मस्थळी विराजमान झाले. भव्य राम मंदिराची उभारणी करण्यात आली. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असणार्या रामभक्तांची ईच्छापूर्ती झाली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात रामराज्याची संकल्पनाही सत्यात उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध ठिकाणच्या कार्यक्रमात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश गोमचाळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवि सुडे यांच्यासह पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.